Tuesday, February 2, 2010

पतीने केलेले पत्नीचे रेखांकन

पुरुषोत्तम खेडेकर यांनी राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या कर्तृत्ववान पत्नी रेखाताई खेडेकर यांच्यावर लिहिलेले ‘रेखांकन’ हे चरित्रात्मक पुस्तक! या पुस्तकावर प्रस्तावनावजा लिहिलेल्या या लेखात इंगोले यांनी मराठी साहित्यात पत्नीवर पतीने लिहिलेल्या पुस्तकांचा, तसंच कथा-कवितादी वाङ्मयाचा घेतलेला हा विवेचक परामर्श..
‘रेखांकन’ पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते संपूर्ण वाचले. योगायोगाने तत्पूर्वी विदर्भातीलच असलेल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यावरील ‘महाराष्ट्रकन्या’ पुस्तक वाचले होते. ते माझ्याकडे मी त्याचा वऱ्हाडी बोलीत अनुवाद करावा म्हणून वाचण्यासाठी आले होते. ‘रेखांकन’ वाचताना मला त्याची सारखी आठवण होत होती. पुन्हा योगायोगानेच ‘रेखांकन’मध्ये प्रतिभाताईंच्या हस्ते रेखाताईंचा सत्कार झाल्याचा उल्लेख होता. ‘महाराष्ट्रकन्या’ हे प्रतिभाताईंचे चरित्र आहे आणि ‘रेखांकन’ही तसे चरित्रच आहे. या दोन्ही पुस्तकांतील साम्य म्हणजे- या दोन्ही स्त्रिया राजकीय क्षेत्रात त्यांच्यापरीने स्थान आणि सन्मान टिकवून आहेत. आणि दुसरे साम्य म्हणजे- ही दोन्ही पुस्तके वाचताना माझ्यासारख्या रसिकाला ती औपचारिक वाटतात.
कदाचित या औपचारिकपणाचे कारण माझ्या मते, या पुस्तकांच्या चरित्रनायिकांबद्दल त्या- त्या लेखकाला वाटलेला आदर हेच आहे. आज प्रतिभाताईंबद्दल सबंध देशालाच आदर वाटतो, त्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण स्वत: ‘पुरुषोत्तम’ असणाऱ्या लेखकाला रेखाताईंबद्दल इतका आदर वाटणे वैशिष्टय़पूर्ण आहे. या आदरामुळेच हेही पुस्तक औपचारिक वाटले असावे. पण या पुस्तकांत मुख्य फरक आहे, तो म्हणजे- एका पुस्तकाचा लेखक केवळ चाहता आहे, तर दुसऱ्या पुस्तकाचा लेखक चाहता तर आहेच, पण पतीही आहे. पती असूनही पत्नीचा चाहता असणे, ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे या दुसऱ्या पुस्तकाचे स्थान वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यादृष्टीने आतापर्यंतचे बहुधा हे पहिलेच पुस्तक असावे. याला अपवाद कालिदासाच्या ‘मेघदूता’चा असावा. कारण पत्नी जिवंत असताना तिचा विरह असह्य़ होऊन कालिदासाने मेघांकरवी तिला पाठविलेला निरोप म्हणजे ‘मेघदूत’.
स्त्रियांच्या हयातीत त्यांना मानसन्मान, प्रतिष्ठा मिळण्याचे योग फारच दुर्मीळ असतात. ते प्रतिभाताईंच्या आणि रेखाताईंच्या वाटय़ाला आलेत. त्या अर्थी त्या भाग्यवानच ठरतात. आणि या दोघींबाबत त्यांच्या पतीचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते, हेही रेखांकित करणे आवश्यक आहेच. ‘रेखांकन’ हे पुस्तक त्यातील भाषेमुळे आणि आदरार्थी संबोधनामुळे, तसेच निवेदनाच्या पद्धतीमुळे औपचारिक वाटत असले तरी ते पतीने लिहिलेली पत्नीबद्दलची जाहीर ‘कौतुककथा’ या स्वरूपाचे झाले आहे. या कौतुककथेत लेखक तटस्थ वाटतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लेखकाचा वैयक्तिक मोठेपणा हेच असू शकते. रेखाताईंना कितीही मोठेपणा दिला तरी त्यांच्या पतीच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्वाचे गुण लपत नाहीत. कदाचित या प्रभावामुळेच हे लेखन वेगळ्या साच्याचे झाले असावे. याच स्वरूपाचे लेखन डॉ. अनुराधा वऱ्हाडे या एका राजकीय पुढाऱ्यांच्या पत्नीने केलेले आहे. पतीच्या निधनानंतर तिने आपल्या पतीच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना वाचकांना भावनाविवश केले आहे. ‘सखा’ या नावाचे तिचे हे पुस्तक तसे आत्मचरित्रात्मकच म्हणावे लागेल. पण कदाचित ती स्त्री असल्यामुळे स्त्रीची जी भाषा असते, त्यामुळे ते प्रभावी वाटत असावे. स्त्रियांना हृदयाची भाषा बोलता येते आणि थेट हृदयाशी भिडताही येते. त्या तुलनेत पुरुषांची भाषा रोखठोक असते. अर्थात लेखक याला अपवाद असतात. भाषा कशीही असो, ‘रेखांकन’ पुस्तक महत्त्वाचे आहे, कारण ते पत्नीच्या जिवंतपणी तिला मन:पूर्वक श्रेय देऊन व सर्वार्थाने ऋण व्यक्त करून लिहिले गेले आहे. याला मनाचा खूप मोठेपणा लागतो आणि तो एखाद्या पुरुषोत्तमाकडेच असू शकतो.
नाही तर मराठीतीलच काय, पण संस्कृतातीलही पत्नीबद्दलची गीते, लेखन हे विरहगीते वा विरहकथा या स्वरूपाचेच आहे. संस्कृतमध्ये ‘मेघदूत’चा उल्लेख वर आलाच आहे, पण कालिदासाच्या ‘रघुवंशा’त ‘अजविलाप’ नावाचा हृदयस्पर्शी भाग ‘अज’ राजाने- म्हणजेच दशरथाच्या पित्याने आपल्या पत्नीबद्दल तिच्या मृत्यूनंतर केलेला शोक याच स्वरूपात आला आहे. पुन्हा योगायोगाने ही इंदुमती विदर्भकन्याच होती. त्यानंतर एकोणविसाव्या शतकात केशवसुत-पूर्वकाळात कवी लेंधे यांनी ‘शोकावर्त’ नावाचे काव्य लिहिले होते, पण ते पत्नीच्या निधनानंतरच. ‘विलापलहरी’ नावाचे काव्य कीíतकर या कवींनी आपली पत्नी सोनाबाई हिच्या मृत्यूनंतरच लिहिले. त्यातून त्यांच्यातील तत्त्वज्ञ आणि कवी असा दुहेरी आविष्कार प्रकट झाला, पण त्याला निमित्त पत्नीच्या निधनाचेच झाले. मराठी साहित्यात पतीने पत्नीबद्दल लिहिलेले साहित्य शोधू गेल्यास विलापिकांचे भांडारच खुले होते. त्यात कविवर्य तांबेंचाच फक्त अपवाद करावा लागतो.
‘कधी रुसतेसी कधी हसतेसी,
लेकरांमध्ये कधी रमतेसी,
ही अपूर्व शक्ती सगुण झाडितसे मम अंगण,
हे माझे भाग्य बघून जळफळतील देवही ते!’
(तांबे- एक अध्ययन पृ. ८४)
किंवा ‘माझी भार्या’ ही कविता लिहिणाऱ्या रेव्हरंड टिळक यांचासुद्धा! शिवाय गंगाधर गाडगीळ यांच्या ‘तलावातील चांदणे’ कथेचाही अपवाद आहेच. बाकी रा. ग. जाधव यांचे ‘वियोगब्रह्म’ हे पुस्तक हे नावातच वियोग असणारे आहे. कवी अनिलांचे विलापिका गीत तर प्रसिद्धच आहे.
‘अजुनी रुसुनी आहे। खुलता कळी खुलेना
ओठही मिटले तसेच ओठ पाकळी उमलेना.’
पण पत्नीच्या वियोगाच्या दु:खातूनच ही रचना झालेली आहे. आता आता शंकर वैद्यही सरोजिनीबाईंबद्दल लिहायला लागले आहेत, पण ते पत्नीच्या निधनानंतरच!
याचा अर्थ पत्नीबद्दल बोलायला पुरुष कचरतात तरी किंवा तिला मोठेपणा देण्याबाबत कद्रूपणा तरी करतात. याला कारण त्यांना पत्नी ही बरोबरीची वाटतच नाही, तर दासीच वाटते. अशावेळी अमृता प्रीतमची कविता आठवते आणि खरे तर तेच तमाम भारतीय स्त्रीचे वास्तव असते.. स्त्रीजन्माचे भीषण दर्शन असते.
‘अन्नदाता। मै मांस की गुडिया
खेल ले, खिला ले, लहू का प्याला पी ले, पिला ले
तेरे सामने खडी हूँ, इस्तेमाल की चीज
कर लो इस्तेमाल।’
किंवा-
‘उगी हूँ, पिसी हूँ, बेलन से बिली हूँ,
आज गर्म तवे पर, जैसे चाहे उलट लो,
मैं निगले से बढकर, कुछ भी नहीं
जैसे चाहे निगल लो!’
त्यामुळेच पत्नी अन्याय सोसत राहते. पती तिला गृहीत धरीत राहतो. तिच्या भावभावनांकडे दुर्लक्ष करतो. चुकूनही तिच्या गुणांचे कौतुक करीत नाही किंवा तिला तसूभरही मोठेपणा देत नाही. याला कारण त्याला आपल्याला ‘बायल्या’ म्हणतील याची भीती वाटते. ‘बायल्या’ या शब्दाची पुरुषवर्गात एवढी दहशत आहे की, त्यांना एक वेळ आई-बहिणीवरून दिलेल्या शिव्या सहन होतील, पण ‘बायल्या’ म्हटलेले सहन होत नाही. त्यामुळे तो चुकूनही दुसऱ्यांजवळ बायकोची तारीफ करीत नाही. ती मेल्यावर मग तिची तारीफ केली तर कोणी ‘बायल्या’ म्हणणार नाही, याची खात्री वाटल्यावरून मग पुरुष बायकोबद्दल बोलायला- लिहायला लागतात. त्यातूनच मग ‘विलापिका’ हा वाङ्मयप्रकार हाताळला जातो.
आत्मचरित्रातही बायकोबद्दल पुरुष बिचकतच लिहितात. जितके भरभरून आईवर लिहितात, तितके भरभरून बायकोवर लिहीत नाहीत. कथा वा कादंबरीतूनही बायकोचा कर्तेपणा शक्यतो चित्रित करीत नाहीत. भारत सासणेंची एक कथा मला यासंदर्भात आठवते. त्या कथेतील नायक एक समाजसुधारक असतो. त्याची बायको अडाणी, आडवी चिरी लावणारी असते. विशेष म्हणजे तो स्वत:ला पुरोगामी व बायकोला अडाणी समजत असतो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा राबता असतो. बायको बिचारी कोंबडय़ा पाळते, शेळ्या पाळते, जमेल तेवढे नवऱ्याला सहकार्य करते. एकदा मात्र नवऱ्यावर काहीतरी पेचप्रसंग येतो. त्याला त्यातून सुटण्याचा मार्गच गवसत नाही. तो अस्वस्थ होतो. सतत नवऱ्याकडे तन- मन-धन व कानसुद्धा लावून असणारी त्याची बायको त्या समस्येवर तोडगा काढते, तेव्हा त्याला बायकोचे महत्त्व पटते. आणि आपण जे आपला संसार तोलून आहोत ते खरे नसून, आपल्या आडव्या चिरी लावणाऱ्या अडाणी बायकोने आपला संसार तोलून धरला आहे, याची त्याला प्रचीती येते. खरे म्हणजे सर्वाच्याच संसाराबाबत हेच खरे असते. पण तसे कोणी कबूल करीत नाही. त्यामुळे पुरुषाच्या अंहकाराला ठेच पोहोचते. त्यामुळेच लोक बायकांना दाबून ठेवतात. शक्यतो वर येऊ देत नाहीत. त्या राजकारणात पदावर जरी चढल्या तरी त्यांचे नवरेच सत्ता गाजवतात. त्यांच्या क्षेत्रात लुडबुड करतात. अशावेळी कितीही प्रोटोकॉल असला तरी ते त्याला घाबरत नाहीत. ‘बायकोचा नवरा’ या नात्याने तिच्या पदापेक्षा स्वत:ला उच्च समजतात. असे घडते की नाही, हे प्रत्येकाने आपल्या मनालाच विचारावे.
आणखी एक घडते. समजा- एखाद्या बायकोला नवरा मदत करीत असेल तर त्याचीही समाज खिल्ली उडवतो. शक्यतो तिला सहकार्य करण्यापासून नवऱ्याला कसे परावृत्त करता येईल, याची शक्यतो खबरदारी घेतो. अथवा ‘राजे हो! तुम्ही म्हणून इतकी कामे करता! दुसरा कोणी असता तर केलीच नसती!’, असे म्हणत नवऱ्याच्या मनात वेगळ्या अहंगंडाचे बीज तरी पेरतो किंवा काम न करण्याचा, असहकार्याचा दुराग्रह तरी उत्पन्न करतो. म्हणूनच ‘रेखांकन’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे. त्याच्या वैचारिक बाजामुळे हे लेखन वेगळे वाटत असले तरी ते वेगळ्या मार्गावरचे पहिले पाऊल आहे, एवढे नक्की!
आत्मचरित्रातील पत्नीबद्दलचे उल्लेख हे स्वत:चेच मोठेपण सिद्ध करण्यासाठी खरे तर वापरलेले वाटतात. त्यातून काही आत्मचरित्रांचा अपवादही असू शकेल. उदा. आनंद यादव यांच्या ‘घरभिंती’ आणि ‘काचवेल’ या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांमधील पत्नी स्मिताबद्दलचे उल्लेख किंवा ग. प्र. प्रधानांसारख्या चार वेळा आमदार झालेल्या मान्यवर नेत्याने आपल्या ‘माझी वाटचाल’ (२००४) या आत्मचरित्रात आपल्या पत्नीबद्दल गौरवाने लिहिले आहे. या आत्मचरित्राचा मुख्य भाग त्यांच्या पत्नीवरच आहे. त्यांची पत्नी आयुर्वेदाची डॉक्टर होती आणि तिने घरची आर्थिक जबाबदारी घेतली म्हणूनच आपण फग्र्युसन कॉलेजची नोकरी सोडून स्वत:ला समाजकार्याला वाहून घेतले, अशी कबुली त्यांनी दिली आहे. शिवाय पत्नीने प्रत्यक्ष कातकरी लोकांमध्ये जाऊन आणि स्वत: आदिवासी भागात राहून औषधोपचार केले. हे काम आपल्या कामापेक्षा जास्त मोलाचे आहे, असेही त्यांनी आवर्जून लिहिले आहे. पण हेही त्यांनी पत्नी वारल्यानंतरच लिहिले आहे. ‘स्त्रियांच्या सर्जनतेवरील बंधने दूर केलीच पाहिजेत,’ असे आग्रही प्रतिपादन करणाऱ्या डॉ. आ. ह. साळुंके यांनीही त्यांची पत्नी दिवंगत झाल्यावर ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ हे भावकाव्य लिहिल्याचा उल्लेख ‘रेखांकन’मध्येच आहे.
‘श्री तुझं असणं आणि नसणं!
एका अक्षराचा फरक
पण एका विश्वाचं अंतर
एक सर्वागीण परिपूर्ण
दुसरं अनेक अंगांनी अपूर्ण!
तू असताना तुझ्यासह निखाऱ्यावरनं चाललो
तेव्हा त्याचे गालिचे झाले..
पण तू नसताना तुझ्याविना
गालिच्यावर चालतो तेव्हा पाय निखाऱ्याप्रमाणे भाजतात..’
खरं तर हे प्रत्येक पतीचं मनोगत असायला हवं. कारण प्रत्येक स्त्री संसारात निखाऱ्यांची फुलं करते. संसाराचे चटके स्वत: सोसते. मुलाबाळांना घडविते. पण तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा ती मेल्यावरच नवऱ्याला होते. एखाद्याने ‘सखे साजणी’ म्हणत ‘तुझ्या टपोर डोळ्यांत माझं इवलंसं गाव’ असे जरी म्हटले तरी ती त्या शृंगारगीताची स्टाईल असते. अर्थात हे वक्तव्य सर्वसाधारण आहे. प्रा. ज्ञानेश वाकुडकरांशी त्याचा संबंध नाही. प्रत्यक्षात नवऱ्याला बायकोचे डोळे टपोरे असतात तेव्हाच हे गाव दिसते. तिचे डोळे बाळंतपणामुळे आसवं ढाळू लागले की, हा आपले गाव शोधण्यास दुसरे डोळे शोधू लागतो अथवा तिच्या वयस्कतेमुळे डोळ्यांचे सौंदर्य ओसरण्याचीही वाट न बघता दुसऱ्या डोळ्यांचा ध्यास धरतो. त्याचे डोळे कायम दुसरी स्त्री शोधू लागतात. समाजातील बहुतांशी पुरुषांना हे लागू पडावे. मानसी नावाची कवयित्री आपल्या ‘बाहुली’ काव्यसंग्रहात ‘बाप’ या कवितेत म्हणते..
‘बाबा! आता तुम्हालाही बाईचा मोह पडलाय
आई रडत बसली आहे कोपऱ्यात
आणि तुम्ही कधी घराशेजारी, कधी कचेरीत
येता जाता बाईच्या शोधात..’
खरं सुशिक्षितांनी असं वागायला नको. कचेरीत जाणारे शिकलेले असतातच. पण यात आपण पत्नीचा अपमान करतो आहोत, याचेही त्यांना भान नसते. किमान असा असह्य़ अवमान तरी पत्नीच्या वाटय़ाला येऊ नये. मग नवऱ्याने चांगले म्हटले नाही तरी चालेल. पण असे वागून जेव्हा बायको ऑब्जेक्शन घेत नाही (परफेक्ट शब्द गवसला नाही.) तेव्हा मात्र तो आवर्जून पत्नीला चांगली म्हणतो..
मग मला बोलली-
‘आपकी बीवी बहोत अच्छी है’
मी म्हणालो-
‘वो सिर्फ अच्छी नहीं
मन की भी सच्ची है’
( बच्चूभायची वाडी- पृ. ९५)
हा संवाद असाच. तो कुठे, कोणाशी केला आहे, हे आपण ओळखले असेलच. आपल्या वागण्यावर पांघरूण घालणारा. तसे संस्कृतीचे पांघरूण तर कायम असतेच अंगावर. भोवताली. विष्णू सूर्या वाघ आपल्या कवितेत म्हणतात-
‘आपल्या पापांचे अजस्र डोंगर
सराईतपणे लपविताना
तुम्ही फितवलं आभाळ
नि विकत घेतली माती
मला दुय्यम स्थान देऊन
पुरुषप्रधान रिवाजांनाच
तुम्ही म्हणू लागता..’
(संस्कृती- बच्चूभायची वाडी, पृ. २०)
पण ‘रेखांकन’सारखी पुस्तकं खरंच लिहिली गेली तर ही संस्कृती बदलायला वेळ लागणार नाही. मुंबईच्या ‘बच्चूभायची वाडी’सारखी नाच, गाणं-बजावणं आणि आणखीही बरंच काही करणाऱ्या स्त्रियांची वस्ती मग निर्माणच होणार नाही. आपल्या पत्नीकडे खऱ्या आदरानं, आपुलकीनं आणि कृतज्ञतेनं पाहणारा नवा पुरुषवर्ग तयार झाला तर स्त्रियांचे प्रश्नच मिटतील. एक नवा समाज उदयास येईल.
त्यामुळेच या पुस्तकाची भाषा महत्त्वाची नाही, तर त्यातली भावना महत्त्वाची आहे. पुरुषोत्तम खेडेकरांचा पिंड नेत्याचा असल्यामुळे या पुस्तकाची वैचारिक मांडणी झालेली जाणवते. त्यात त्यांनी विषयवार सविस्तर मांडणी केल्यामुळे या पुस्तकाचा बाज माहितीपर असा झाला आहे. तरीही ते ‘पतीने लिहिलेले पत्नीचे चरित्र’ या स्वरूपाचेच झाले आहे.
या पुस्तकात त्यांनी आपण रेखाताईंवर फिदा झाल्याचे प्रामाणिकपणे लिहिले आहे. ते वाचून मला ‘रेखा ओ रेखा’ या चित्रपटगीताची आठवण झाली. माझ्या तरुणपणी हे गाणे लोकप्रिय होते आणि चित्रपट अभिनेत्री रेखाही. त्यांनी केवळ रेखाताईंचाच मोठेपणा या पुस्तकात व्यक्त केलेला नाही, तर आपल्या सासुरवाडीचाही मोठेपणा त्यात कथन केला आहे. हे घराणे मध्य प्रदेशात का व कसे गेले? त्यांनी तिथे इतका दानधर्म केला, की त्यामुळे त्यांना लोक दानी व दानशूर म्हणू लागले. नाही तर काही फक्त नावाचेच ‘दाणी’ असतात, पण मुळात खूप कंजूष असतात. मराठीत एक म्हण आहेच- ‘नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा.’
या पुस्तकात बऱ्याचदा पुनरावृत्ती वाटते. पण माझ्या असे लक्षात आले आहे की, ही पुनरावृत्ती रेखाताईंच्या गुणवर्णनाबाबतच होते. त्यांचा सरळ-साधा स्वभाव, नि:स्वार्थी वृत्ती, सामाजिक जाणिवांचा अभ्यास, सुस्पष्ट विचार व निर्भीड बाणेदारपणा या गुणांचा ते वारंवार उल्लेख करतात. तर त्यांचा देखणेपणा मुद्दामहून अधोरेखित करीत राहतात. या पुस्तकातील मला आवडलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यात वरचा क्रमांक वेळोवेळी जो कंसात मजकूर दिलेला आहे त्याचा लागतो. कारण या मजकुरात एक वेगळाच मिस्कीलपणा तर आहेच, पण त्याची भाषा हृदयातून आलेली आहे. त्यावेळी लेखक सच्चा वाटतो. त्याने चढवलेला औपचारिक मुखवटा गळून पडतो. विशेष म्हणजे हे वाचताना वाचक खुदकन् हसतो. या कंसांतील मजकुराची खरे तर वेगळी चिकित्सा करायला हवी. एखाद्या वस्त्राला जरीची किनार असावी, तशी किनार या मजकुराची आहे.
दुसरी मला आवडलेली गोष्ट म्हणजे- त्यांचे लग्न झाल्यावर त्यांनी ‘रेखा दाणी माझी पत्नी झाली’, असे म्हटले नाही तर, ‘अंजी खेडेकर गावची सून झाली’, असे म्हटले आहे. आणि मराठा स्त्रीचे हेच वैशिष्टय़ आहे. ती फक्त कुटुंबाची राहत नाही, तर त्या संपूर्ण गावाची होते. अडीअडचणीत गावकऱ्यांना ती साथ देते. रेखाताईंबाबत थोडे वेगळे घडले. गावकऱ्यांनी त्यांना साथ देऊन निवडून दिले. पण यासंदर्भातील मला आवडलेली आणि खूपच दुर्मिळ गोष्ट म्हणजे त्या निवडून आल्याचे पूर्ण श्रेय खेडेकरांनी त्यांना देऊन टाकले आहे. असे कधीच घडत नाही. लोक काहीच न करता श्रेय घेण्यास हपापलेले असतात. शिवाय बायकोच्या- त्यातही राजकीय क्षेत्रातील- यशात नवऱ्याचा वाटा असतोच. कारण त्या काळी तरी राजकारण हे स्त्रियांसाठी नवखे क्षेत्र होते आणि पुरुष त्यात मुरलेले होते. अशावेळी पुरुषांच्या सहकार्याशिवाय गड जिंकणे अशक्यच. विदर्भात यालाच ‘सीट निघणे’ म्हणतात. त्यातही रेखाताई सूनबाई! तेव्हा त्यांना सर्वाचेच सहकार्य लाभले असणार! त्या प्रत्येक घरात गेल्या असतील. महिला असल्यामुळे प्रत्येकीच्या चुलीपर्यंत गेल्या असतील. त्यांचा संपर्क दांडगा असेल. त्यांच्या पक्षानेही प्रचारात सहकार्य केले असेल. या सर्व बाबी मान्य करूनही पतीच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व अशक्य आहे. तेव्हा आपण हा विनयाचा उद्गार समजूयात. पत्नीबाबत तर काही केले नाही तरी नवरा श्रेय घेतो. पत्नीवर आपली मालकी आहे- तेव्हा तिच्या कार्यावर, कामावर आणि कर्तृत्वावरही आपलीच मालकी आहे, असे तो समजून चालतो. शिवाय पत्नीच्या यशात सिंहाचा वाटा पतीचाच आहे, असे समाजही गृहीत धरतो. परंतु आपल्या पत्नीला मोठेपणा द्यायला खूप मोठे सुपाएवढे काळीज लागते. ते काळीज खेडेकरांजवळ आहे. त्यामुळे ते पत्नीबद्दल चांगले लिहू व बोलू शकतात आणि इतर स्त्रियांबद्दल व स्त्री- जातीबद्दलही ते चांगलेच बोलतात..
‘‘निसर्गाच्या रचनेनुसार स्त्रीमध्ये अनेक निर्मितीक्षम गुणांचा समुच्चय झालेला आढळतो. भारतीय लोकजीवनात स्त्रियांना सर्वोच्च सन्मान दिला जायचा. स्त्रियांचा प्राकृतिक स्वभाव हा मानवतावादी असतो. स्त्रियांची निर्णयक्षमता, कल्पकता, सौंदर्यदृष्टी, सहनशीलता, संग्राहकता, क्रयशक्ती, गुणग्राहकता इत्यादी बाबींचे अनेक सुरेख संगम जन्माबरोबरच रेखाताईंमध्ये आहेत.’’ (रेखांकन- पृ. ५०) या विधानात ते स्त्रियांमध्ये हे गुण असतात अशी स्पष्ट कबुली देतात, हे महत्त्वाचे आहे. वास्तविक स्त्रियांमधील चांगले गुण मान्य करण्याची दानत पुरुषांमध्ये नाही. मी हे विधान जबाबदारीने करीत आहे. म्हणूनच एखादी स्त्री मोठी झाली की तिच्याबद्दल चांगले बोलण्यापेक्षा वाईट बोलण्यातच अनेकांना धन्यता वाटते. तिच्याबाबत अपप्रचार करण्यात कोणालाच गैर वाटत नाही. अशावेळी पुरुष आघाडीवर असतात. पुरुषांबद्दल स्त्रिया मात्र आदराने व चांगले बोलतात. त्या नेत्यांना भाऊ, दादा, काका, गुरुजी म्हणतात. पती राजकारणात असला तर पत्नीला त्याचे खूपच भूषण वाटते. डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे याबाबत उदाहरण देता येईल. त्यांच्या पत्नीने ‘चिंतामणी अँड आय’ नावाचे इंग्रजीत आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवाद ‘आमची कथा’ या नावाने उपलब्ध आहे. विशेष म्हणजे डॉ. सी. डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाईंनी तो काळ साक्षात् उभा केला आहे. पण पत्नी उच्च पदावर वा राजकारणात असली तरीही तिच्या पतीने तिच्या नावाने आत्मचरित्र लिहिल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. मग तिच्यावर पुस्तक लिहिणे अथवा तिचे चरित्र लिहिणे तर दूरच. पण ‘रेखांकन’मध्ये असे घडले आहे. त्यामुळे हे पुस्तक सुवर्णरेखांनी लिहिण्यासारखे आहे.
या पुस्तकात खेडेकरांनी- आमचा संसार लांडगा व शेळीसारखा चालू असावा असे लोकांना वाटते, असे म्हटले आहे. पण जो माणूस बायकोवर एवढे पराकोटीचे प्रेम करतो, तो बायकोशी जगापेक्षा अधिक उत्कट भावनेने वागतो, याची मला खात्री आहे. तेव्हा आता लोकांनी त्यांचा संसार सिंह आणि सिंहिणीप्रमाणे चालू आहे, असे समजावे. मी इथे आधी वाघ म्हणणार होते, पण तुम्ही कदाचित वेगळा अर्थ काढाल म्हणून सिंह म्हटले आणि वाघापेक्षा सिंह केव्हाही बरा. कारण तो जंगलाचा राजा असतो.
‘रेखांकन’मध्ये शेवटी खेडेकरांनी तमाम पुरुषांना- बायकोवर एक तरी पुस्तक लिहा, असे आवाहन केले आहे. परंतु त्याकरता खेडेकरांना निदान चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये तरी वाचनाची आवड उत्पन्न करावी लागेल. कारण आज समाजातील वाचनाची आवड संपली आहे. त्यामुळे असे पुस्तक लिहूनही ते कोणीच वाचले नाही तर ते एखादा निरुपयोगी दागिनाच ठरेल. तेव्हा लोकांनी ते वाचले पाहिजे. शिवाय अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी खेडेकरांनी सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपणच केवळ प्रकाशवाटेवरून चालायचे असे नाही, तर सर्वाना घेऊन चालायचे, ही लक्षणे खरे तर साधुत्वाची आहेत. तेव्हा त्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर प्रतिसाद द्यावा आणि बायकोच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हे ऋण मानले तरच! नाही तर मुलंबाळं ते मानतातच.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- आता त्यांच्या या चळवळीमुळे संपूर्ण बहुजन समाज पत्नीकडे आदराने पाहू लागेल. तशी लाटच उत्पन्न होईल. यासाठी एक स्त्री म्हणून मला त्यांना धन्यवाद द्यायला हवेतच. स्व. ह. ना. आपटे यांनी पहिल्यांदा ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी लिहिली. त्यावेळी केशवसुतांनी त्यांच्यावर एक कविताच लिहिली होती. ती अशी-
‘‘टाकावे अपुल्या दुराग्रह जुना मर्मी तसा विंधुनी
स्त्रीजातीस असाच काढ वरती। घे कीर्ती संपादुनी’’
(समग्र केशवसुत- पृ. २०२)
तसेच पुरुषोत्तम खेडेकर यांना स्त्रियांसाठी चांगले उन्नयनाचे कार्य करून कीर्ती संपादित करावी, अशा शुभेच्छा देते. त्या दोघा उभयतांना मन:पूर्वक हार्दिक सदिच्छा देऊन थांबते. या ‘रेखांकना’चा समाजालाही उपयोग व्हावा, अशाही सदिच्छा देते.

    No comments: